पुणे : प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकानेच नियम पाळले पाहिजेत. मागील दोन वर्षानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. वास्तविक बंधने घालणे हे सरकार म्हणून आम्हालाही योग्य वाटत नाही, मात्र जनतेच्या सुरक्षिततेसाठी काही निर्णय घ्यावे लागतात असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यात आयोजित मेळाव्यात अजित पवार यांनी कोरोनाबद्दल भूमिका स्पष्ट केली. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार वंदना चव्हाण, आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, रमेश थोरात, नागरी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, प्रशांत जगताप, अंकुश काकडे, प्रदीप गारटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यात मागील काही दिवसात कोरोनाची परिस्थिती बदलू लागली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळेच विधीमंडळ अधिवेशनातही आपण कोरोनाबद्दल स्पष्ट भूमिका मांडली. कालच सुप्रिया सुळे यांचं संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आलंय. अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रत्येकानेच याबाबत खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाने गंभीर स्वरूप प्राप्त केल्यास राज्यात निर्बंध लागू करावे लागतील. वास्तविक गेल्या दोन वर्षानंतर परिस्थिती सुधारत असतानाच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वास्तविक बंधनं घालणं सरकार म्हणून आम्हालाही योग्य वाटत नाही, मात्र जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने काही निर्णय घेणे आवश्यक असतात, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.