Site icon Aapli Baramati News

Corona Update : राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी सज्ज रहा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

ह्याचा प्रसार करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला राज्यातील नवीन कोरोना विषाणू सद्यस्थितीसह उपाययोजनांचा आढावा; उपाययोजनांसंदर्भात कोविड टास्क फोर्स सोबत केली चर्चा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला  असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे, इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयाने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. योग्य प्रकाराच्या मास्कचा वापर, आरोग्य यंत्रणेकडील मनुष्यबळ, प्रमाणित उपचार पध्दती, विलगीकरण कालावधी आदी विषयांवर कोविड टास्कफोर्सच्या टीमसोबत उपमुख्यमंत्र्यांनी विस्तृत चर्चा केली.

राज्यातील नवीन कोरोना विषाणू सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय , राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवेचे आयुक्त एन. रामास्वामी यांच्यासह व्हिसीव्दारे कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडीत, डॉ. अजित देसाई उपस्थित होते.

राज्यातील कोरोना संसर्गाने बाधितांची संख्या वाढत आहे, ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी.

कोरोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना दिल्या.             


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version