मुंबई : प्रतिनिधी
मागील तीन वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. केरळ राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातही सोमवारी दिवसभरात १३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्यामुळे धाकधूक वाढली आहे. दरम्यान, नव्याने आढळलेले सर्व रुग्ण मुंबईतील आहेत. त्यातील एकजण रुग्णालयात दाखल असून उर्वरीत रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.
केरळमध्ये मागील काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेजारील राज्यांनी धोका लक्षात घेऊन दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. केरळमध्ये रुग्णांची वाढती संख्या आणि JN.1 या नव्या व्हेरीयंटचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर केंद्र शासन सतर्क झाले आहे. केंद्राकडून सर्वच राज्यांनी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राच्या साप्ताहिक अहवालानुसार २२ ते २७ नोव्हेंबर दरम्यान आठ रुग्ण आढळले होते. नंतरच्या आठवड्यात म्हणजेच २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान यात वाढ होऊन रुग्णसंख्या १४ वर आली. ५ ते ११ डिसेंबरदरम्यान २२ रुग्ण आणि गेल्या आठवड्यात १८ डिसेंबर रोजी २५ रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारीपासून आजपर्यंत जवळपास १३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.