मुंबई : प्रतिनिधी
कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ओमीक्रॉनमुळे शाळा आणि महाविद्यालय १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजणार आहे. त्यातच आता राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. महाविद्यालय सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करून त्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, शाळा आणि महाविद्यालय बंद झाल्यामुळे विरोध दर्शवला जात होता. ऑनलाईन शिक्षण बंद करून ऑफलाईन शिक्षण चालू ठेवावे, अशी मोठया प्रमाणावर विद्यार्थ्यांची मागणी येत होती. त्यामुळे राज्य सरकारने २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे निश्चित केले आहे.आज किंवा उद्या महाविद्यालयबाबत निर्णय होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.