मुंबई : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी सभागृहात चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन,संजय कुटे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. यामध्ये सरकारी वकिलांनी पोलिसांचा सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन,संजय कुटे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी कट रचण्यात आले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सगळे आदेश दिले होते. धाडी कशा टाकायच्या, चाकू कसे ठेवायचे, मोक्का कसा लावायचा या संदर्भातील सगळ्या सूचना देण्यात आल्या होत्या. सगळा कट सरकारी वकिलांच्या कार्यालयातून शिजला होता. यामध्ये पोलिसांचा सहभाग होता. हे सगळे सरकारच्या मदतीने चालू होते, असा आरोप देवेंद्र फडणीस यांनी केला.
खोट्या तक्रारी दाखल करून खोटे साक्षीदार आणि पंच उभा करून विरोधकांना गोत्यात आणण्यासाठी हे कुभांड रचण्यात आले. या संदर्भात झालेल्या संभाषणाचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. व्हिडीओ तब्बल सव्वा तासांचा आहे. यावर २५ ते ३० भागांची वेबसिरीस तयार होईल. पोलिसांचाही सहभाग आहे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत केली जावी, अशी मागणी देवेंद्र फडणीस यांनी सभागृहात केली.