पुणे : प्रतिनिधी
पुण्यात लॉकडाऊन करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयाला दिली जाणारी आकडेवारी ही पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणची होती. त्यावरून न्यायाधीशांनी आपले मत व्यक्त केले. त्यामुळे पुण्यात तूर्तास लॉकडाऊन न करता आहे तेच निर्बंध अधिक कडक केले जातील अशी माहिती देऊन या निर्बंधांचे पालन झाल्यास कोरोनाच्या संकटातून मुक्तता होण्यास मदत होईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात आज कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना अजित पवार यांनी तूर्तास पुण्यात लॉकडाऊनची गरज नसल्याचे स्पष्ट केले. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता ती कमी होत आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन न करता निर्बंध अधिक कडक करण्यात येतील. सध्या लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी झाल्यास कोरोना आटोक्यात येणार असल्याचेही अजित पवार यांनी नमूद केले.
लस दराबाबत केंद्राकडे पाठपुरावा करू
केंद्र सरकारला ज्या दरात लस मिळते, त्याच दरात राज्य सारकारलाही मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगून अजित पवार म्हणाले, केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. परंतु बऱ्याच लोकांना आता दूसरा डोस मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरीक अस्वस्थ आहेत. ही बाब लक्षात घेऊन त्यांना वेळेत लस मिळावी यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.