Site icon Aapli Baramati News

सहकार विभागाची पुण्यातील कार्यालये येणार एकाच छताखाली; नवीन इमारतीला मान्यता

ह्याचा प्रसार करा

पुणे :  प्रतिनिधी  

पुण्यातील सहकार विभागाची  २३ कार्यालये खासगी जागेत भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे कार्यालयीन भाडे देण्यासाठी शासनाचा मोठा निधी खर्ची पडतो. या पार्श्वभूमीवर शहरातील सहकार विभागाची कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी येरवड्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत ‘सहकार संकुल’ उभारले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने वित्तीय आणि प्रशासकीय मान्यता दिली आहे.

सहकार आयुक्तालयाने येरवड्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर ‘सहकार संकुल’ इमारतीचे बांधकाम करण्यासाठी मुख्य सचिवांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने ९४ कोटी ५९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे.

इमारतीचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करूनच कामाची निविदा प्रसिद्ध करावी, तसेच इमारतीत शारीरिक विकलांग, ज्येष्ठ नागरिकांना विचारात घेवून सुविधा कराव्यात, अशा काही अटी राज्य शासनाने टाकल्या आहेत.

सहकार विभागाची शहरात विविध कार्यालये एकाच ठिकाणी नाहीत. मार्केटयार्ड, साखर संकुल, साधू वासवानी चौकाकडे जाणाऱ्या बी. जे. रस्त्यावरील महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची इमारत अशा ठिकाणी सहकार विभागाच्या विविध अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. तसेच सहकार आयुक्तालय मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सहकार विभागाची कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी सहकार आयुक्तालयाने येरवडयातील इमारतीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला होता.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version