
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या महिन्याभरापासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. आज या विस्तारात १८ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, शिंदे सरकारच्या या पहिल्या टप्प्यातील विस्तारात महिलांना डावलण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या नावांची चर्चा होती, अशाही महिला नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे महिलांच्या स्थानावरून विरोधकांनी शिंदे सरकारला घेरले आहे.
मंत्रीमंडळ विस्तारामध्ये आज शिंदे गटाकडून नऊ, तर भाजपकडून नऊ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आज शिंदे गटातील दादा भूसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराजे देसाई, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संजय राठोड आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण यांनी शपथ घेतली आहे.
तत्पूर्वी या विस्तारात दोन महिला नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र महिलांना स्थानच देण्यात आले नसल्याचे पाहायला मिळाले. भाजपकडून पंकजा मुंडे आणि माधुरी मिसाळ या दोघींची नावे चर्चेत होती. मात्र दोघींनाही आजच्या विस्तारात संधी मिळालेली नाही.
पंकजा मुंडे यांना अनेकदा डावलण्यात आल्याने आता संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनाही आज पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. दुसरीकडे आमदार माधुरी मिसाळ यांना देखील मंत्रीपद दिलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. प्रत्यक्षात त्यांनाही आज संधी देण्यात आलेली नाही. शिंदे सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारात तरी या महिला नेत्यांना संधी मिळते का याकडेच सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.