Site icon Aapli Baramati News

BREAKING NEWS : विनायक मेटे यांचा अपघात की घातपात..? चौकशीसाठी पोलिसांची आठ पथके

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. या घटनेनंतर हा नेमका अपघात की घातपात याबद्दल शंकाकुशंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता या अपघाताची चौकशी करण्यासाठी पोलिसांची आठ पथके तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित बैठकीसाठी बोलावणे आल्यानंतर विनायक मेटे हे रात्री बीडमधून मुंबईकडे निघाले होते. मुंबई-पुणे महामार्गावर भातान बोगद्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात मेटे हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दुसरीकडे या अपघातानंतर तब्बल एक तास वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा दावा विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी केला आहे. त्यातच मेटे यांचे वाहन नेमके कोणत्या वाहनाला धडकले याबद्दलही स्पष्टता झालेली नाही. अशातच आता कार्यकर्त्यांसह विविध नेत्यांनीही या अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. हा नेमका अपघात की घातपात याबद्दल आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांची आठ पथके चौकशीसाठी नेमण्यात आली आहेत. या पथकांमार्फत या घटनेची चौकशी होणार असून मेटे यांचा चालक एकनाथ कदम यांच्याकडेही तपास केला जाणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version