मुंबई : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले. परंतु या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही पूर्णपणे झालेला नाही. या पार्श्वभूमीवर लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विस्तारात नाराज आमदारांना संधी मिळते की पुन्हा डच्चू मिळतो याकडेच आता लक्ष लागले आहे.
शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही नेत्यांना संधी न मिळाल्याने त्यांनी उघड उघड आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल असे सांगत नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. हा विस्तार नेमका कधी होणार याबद्दल शंका उपस्थित होत असतानाच आता ५ ऑक्टोबरपूर्वी विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भाजपकडून प्रवीण दरेकर, डॉ. संजय कुटे, गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, राणा रणजितसिंह पाटील, नितेश राणे, माधुरी मिसाळ, राहुल कुल, विजय देशमुख, संभाजी पाटील निलगेकर यांची नावं चर्चेत आहेत. तर शिंदे गटाकडून बच्चू कडू, संजय शिरसाठ, भरत गोगावले, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आबीटकर, किशोर पाटील यांची नावं चर्चेत आहेत.