पुणे : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून विद्यार्थी बारावीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा करत होते. अखेर निकालाची तारीख निश्चित झाली असून उद्या दि. ८ जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे दुपारी एक वाजताच्या दरम्यान हा निकाल जाहीर केला जाईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने पार पडल्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान पार पडल्या. राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.
उद्या ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहेत. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा क्रमांक, आईचे नाव नमूद करावे लागणार आहे. दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर केला जाणार असून शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in आणि www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.