मुंबई : प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावामुळे शासकीय सेवेतील सरळसेवा नियुक्ती प्रलंबित होती. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी २ जानेवारी २०२२ रोजी पूर्व परिक्षा होणार होती. मात्र आता ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
कोरोना काळात जवळपास सर्वच यंत्रणा ठप्प झाल्या होत्या. त्यातच राज्य सेवा पूर्व परिक्षेबाबत कोणतीही जाहिरात प्रसिध्द झाली नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्यांची संधी हुकली होती. या पार्श्वभूमीवर संधी हुकलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २ जानेवारी २०२२ रोजी पूर्व परिक्षा घेण्याचे निश्चित केले होते.
पूर्व परिक्षेबाबतची प्रक्रियाही पूर्ण झालेली होती. मात्र आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या परिक्षांचे नवीन वेळापत्रक नव्याने जाहीर केले जाणार असल्याचेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मागील दोन वर्षात स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. नवीन वर्षात पूर्व परिक्षा होवून भविष्याची वाटचाल निश्चित होईल अशी अपेक्षा असतानाच पुन्हा एकदा या परिक्षा लांबणीवर पडल्या आहेत.