मुंबई : प्रतिनिधी
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल बोलताना चुकीचे वक्तव्य केले. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अशातच शिवसेनेचा शिंदे गटाचे नेतेही आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या विषयावर बोलताना मंत्रिपद गेले खड्ड्यात शिवरायांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नाही, अशा इशाराच दिला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, छञपती शिवरायांबद्दल बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. ते देवांचे देव आहेत. त्यांच्यापेक्षा कोणीही मोठे नाही. मग राज्यपाल असोत किंवा कोणीही असो. कोणीही उठून शिवरायांबद्दल बोलत आहे. यापुढे शिवरायांचा अवमान केला तर मी सोडणार नाही. तो कुठल्याही पक्षाचा असेल, चुकीला माफी नाही, अशा इशाराच त्यांनी दिला आहे.
शिवरायांविषयी कोणीही काहीही बोलत आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. शिवराय हे देवांचे देव आहेत. ज्यांनी शिवरायांचे चरित्र वाचले. त्यांनीच शिवरायांबद्दल बोलावे. शिवरायांबद्दल बोलताना आचारसंहिता करण्याची गरज आहे. यांना शिवरायांच्या नखाची ही सर नाही. त्यामुळे मंत्रीपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान करणाऱ्याला सोडणार नाही, असा सज्जड दमच गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे शिंदे गट-भाजप यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.