मुंबई : प्रतिनिधी
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क असून कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर उपाययोजना केल्या जात आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील परिस्थिती पाहून निर्बंध कडक केले जातील, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या सद्यस्थितीकडे सरकार तिसरी लाट म्हणून पाहत असून शासकीय यंत्रणा यावर बारकाईने लक्ष देत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी आणि कोरोना नियमांचं उल्लंघन यामुळे ही संख्या वाढत आहे. त्यामुळे आता संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती वेगळी असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे गरज पडल्यास कडक निर्बंध लागू करण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी राज्यात २१७२ नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत. हे आकडे चिंताजनक असून गेल्या काही महिन्यातील ही मोठी वाढ आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून टास्क फोर्सही सक्रिय झाला आहे.