पुणे : प्रतिनिधी
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर आज सकाळी जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना याबाबत कठोर कारवाई करण्याच्या आणि या प्रकरणात कोणाचीही हयगय करू नका अशा सूचना अजितदादांनी दिल्या आहेत. आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. यामध्ये लोखंडी गजाने शासकीय वाहनाची तोडफोड करण्यात आली. तसेच श्रीकांत पाटील व त्यांच्या चालकावर मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.
आज पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी इंदापुरच्या घटनेबाबत बोलताना अजितदादांनी या प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही, तशा सूचना पोलिस अधिक्षकांना दिल्या असल्याची माहिती दिली. इंदापूरमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत अधिक माहिती घेतली असता हा हल्ला वाळू माफियांनी केला असावा असा अंदाज आहे. याबाबत मी स्वत: पोलिस अधिक्षकांशी बोलून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती ना. अजित पवार यांनी यावेळी दिली.