
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच त्यांनी राज्य सरकारला ३ मेपर्यंत भोंगे उतरवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता भोंगा लावण्यासाठी सर्व परवानग्या आवश्यक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
गुढीपाडव्यादिवशी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळांवरील भोंगे काढण्याचे आदेश पांडेंनी दिले होते. या निर्णयामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असतानाच आता महाविकास आघाडी सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
सोशल मीडियावर देखील धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिस यंत्रणेला अधिक दक्ष राहण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. मशीदीच्या १०० मिटर परिसरात हनुमान चालीसा लावण्याची परवानगी नाही. हनुमान चालीसा लावायची असल्यासही आता परवानगी घ्यावी लागणार आहे.