मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर दावा सांगत सूत्रे हाती घेतल्यानंतर पदाधिकारी निवडीचा सपाटा सुरू केला आहे. राज्यस्तरावरील पदाधिकारी निवडीनंतर अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मुंबई कार्याध्यक्षपदी नरेंद्र राणे आणि पुणे शहराध्यक्षपदी दीपक मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज मुंबईत अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते या निवडीचे पत्र देण्यात आले.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची सुत्रेही हाती घेतली आहेत. राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांची नेमणूका केल्यानंतर अजितदादांनी आता राज्यभरात पदाधिकारी निवडींचा सपाटा सुरू केला आहे. आज मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मुंबई कार्याध्यक्षपदी नरेंद्र राणे यांची निवड केली. तर पुणे शहराध्यक्षपदी दीपक मानकर यांची नियुक्ती केली आहे.
बुधवारी मुंबईतील एमईटी संस्थेत अजित पवार यांनी पक्षाच्या खासदार, आमदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत शक्ती प्रदर्शन केले. सर्वाधिक आमदार अजितदादांच्या बाजूने असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे अजितदादांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला असून राज्यभरात पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सुरू केल्या आहेत.