अकोले : प्रतिनिधी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिली. या ठिकाणी झालेल्या शेती, पिकं व घरांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच अधिकारी वर्गाकडून नुकसान व मदतकार्याचा आढावा घेत सुचना दिल्या.
विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमानिमित्त दाखल झालेल्या अजितदादांनी अकोले तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्याकडून माहिती घेतली.
यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी आणि प्रशासनाला नुकसानीच्या पंचनाम्याबाबत सुचना दिल्या. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकांना शासन पातळीवरुन मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.