मुंबई : प्रतिनिधी
अभिनेता शाहरुख खान यांचा पुत्र आर्यन खानसह विविध सेलीब्रेटींवरील कारवायांमुळे चर्चेत असणारे समीर वानखेडे यांना एनसीबी अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभागातून हटवण्यात आले आहे. ३१ डिसेंबर हा त्यांचा या विभागातील शेवटचा दिवस असणार असून लवकरच त्यांची अन्य विभागात बदली केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
समीर वानखेडे हे सीमा शुल्क खात्यात कार्यरत होते. मात्र विशेष बाब म्हणून त्यांना अमली पदार्थ नियंत्रण विभागात नेमण्यात आले. त्यानंतर त्यांनी मुंबईत कारवायांचा धडाकाच सुरू केला होता. विशेष म्हणजे बॉलीवूडमधील सेलीब्रेटींवर त्यांनी अनेक कारवाया केल्या होत्या. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावर केलेल्या कारवाईनंतर वानखेडे अधिकच चर्चेत आले.
याचदरम्यान अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणासह अनेक प्रकरणांमध्ये वानखेडे यांनी चुकीच्या पद्धतीने आणि खोटी कारवाई केल्याचा आरोप केला. त्यानंतर नवाब मलिक यांनी सातत्याने वानखेडे यांच्या कार्यपद्धतीसह त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दलही शंका उपस्थित केल्या. त्यामुळे समीर वानखेडे यांची चौकशीही सुरू करण्यात आली असून त्यांच्याकडील पाच महत्वाच्या प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला. अद्याप या चौकशीचा अहवाल प्रलंबित आहे.
दुसरीकडे सातत्याने चर्चेत असलेल्या समीर वानखडे यांना केंद्र सरकारकडून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे केंद्राच्या मर्जीतील अधिकारी म्हणून वानखेडे यांचे नाव घेतले गेले. यावेळी त्यांची मुदतवाढ ३१ डिसेंबरपर्यंत असून यापुढे मात्र त्यांना मुदतवाढ न देता त्यांची अन्यत्र बदली केली जाईल, अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांची अंमली पदार्थ नियंत्रण विभागातील सद्दी संपली असून ३१ डिसेंबर हा त्यांचा या विभागातील शेवटचा दिवस असणार आहे.