
पालघर : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिन्याची शिक्षा सुनावली असल्याचे प्रकरण ताजे असतानाच; शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयाने एका वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना १ कोटी ७५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
राजेंद्र गावित यांनी जागेचा व्यवहार केला होता. या व्यवहारातून त्यांनी उद्योगपती चिराग कीर्ती बाफना यांना दीड कोटी रुपयांचे चेक दिले होते. परंतु राजेंद्र गावित यांनी दिलेले दीड कोटी रुपयांचे चेक बाउन्स झाल्यामुळे चिराग बाफना यांनी राजेंद्र गावित यांच्या विरोधात पालघर जिल्हा न्यायालयात खाजगी दिवाणी खटला दाखल केला होता. या खटल्यात न्यायालयाने राजेंद्र गावित यांना शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याप्रकरणी चांदूर बाजार न्यायालयाने दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. ही घटना ताजी असतानाच महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना न्यायालयाकडून एक वर्षाचे तुरुंगवास आणि पावणे दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.