Site icon Aapli Baramati News

Breaking News : शिक्रापूरमधील तृतीयपंथीच्या खुनाचा अवघ्या चार तासांत छडा; दोघांना अटक

ह्याचा प्रसार करा

शिक्रापूर : प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका तृतीयपंथीची धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी घडली होती. या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार तासात छडा लावत दोन परप्रांतीय आरोपींना अटक केली आहे.

रविवारी दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुणे-नगर महामार्गालगत मोकळ्या मैदानात एका तृतीयपंथीचा मृतदेह आढळून आला होता. या तृतीयपंथीची धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे समोर आले होते. त्यानंतर या तृतीयपंथीची ओळख पटवण्यासाठी तो राहत असलेल्या परिसरात चौकशी करण्यात आली. त्यानुसार आशु उर्फ अनिश रामानंद यादव असे या तृतीयपंथीचे नाव असल्याचे निष्पन्न झाले.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुन्हे शाखेला तात्काळ तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने हा तृतीयपंथी राहत असलेल्या परिसरात चौकशी केली. तसेच हा तृतीयपंथी शेवटच्या वेळी कोणासोबत होता याची माहिती घेतली.

या दरम्यान मिळालेल्या गोपीनीय माहितीनुसार धरमू जोहितराम ठाकूर (वय २०) आणि युगल लालसिंग ठाकूर (दोघेही सध्या रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, मूळ रा. डोंगरगाव, छत्तीसगड)  या दोघांनी हा गुन्हा केल्याचे आणि ते दोघेही पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. या दोघांना सापळा रचून चाकण-शिक्रापूर चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

घटनास्थळी हे दोघेही दारू पित बसलेले असताना तृतीयपंथी आशु यादव याच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केल्याचे आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शिकरांपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे आणि त्यांचे पथक अधिक तपास करत आहेत.

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक फौजदार तुषार पंदारे, हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, पोलिस नाईक योगेश नागरगोजे, चेतन पाटील यांनी ही कारवाई केली.        


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version