मुंबई : प्रतिनिधी
देशात ज्या ज्या ठिकाणी भाजप विरोधी सत्ता आहे, तिथल्या नेत्यांना बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अनेक अधिकारी आरोप करण्यापूर्वी केंद्रीय नेत्यांसह महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठका करतात. त्यानंतर एखाद्या मंत्र्याला टार्गेट केले जात आहे. केवळ विरोधकांच्या हाती सत्ता असल्याने भाजपकडून नियोजित कट रचण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाराष्ट्रातही अशीच पद्धत वापरल्याचे पुरावे असून वेळ आल्यानंतर ते बाहेर काढले जातील, असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून विविध मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. काही मंत्र्यांना अधिकाऱ्यांकरवी लक्ष्य करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज नवाब मलिक यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांवर केले जाणारे आरोप हा भाजपचा कट असल्याचा आरोप केला आहे.
अनेक अधिकारी मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक करतात. त्यानंतर त्यांची केंद्रीय नेत्यांसोबत बैठक होते. तिथून संबंधित मंत्र्याला टार्गेट करण्याचे काम सुरू होते. केवळ भाजपचे विरोधक सत्तेत असल्याने या पद्धतीचा वापर केला जात असून हा भाजपचा नियोजित कट असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. महाराष्ट्रातही अनेक अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या असून त्यांचे पुरावे वेळ आल्यानंतर बाहेर काढले जातील, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून अनेक मंत्र्यांना ईडीच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही मंत्र्यांना चौकशीलाही सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी हा भाजपचाच नियोजित कट असल्याचा दावा केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.