मुंबई : प्रतिनिधी
बुधवारपासून महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. तत्पूर्वी आज सरकारकडून आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. अत्यल्प कालावधीचे अधिवेशन घेऊन सरकारकडून लोकशाही कुलूपबंद करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
२२ डिसेंबरपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सरकारकडून चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारला विविध मुद्यांवरुन लक्ष्य केले.
या सरकारने सत्तेचा गैरवापर करत आमच्या १२ आमदारांना निलंबित केले. विविध घोटाळे करून सामान्यांचे नुकसान केले. लोकशाहीच्या विरोधात सातत्याने काम केलं आणि आता आम्हाला चहापानाला निमंत्रित केलं जातंय असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या अधिवेशनात परीक्षा घोटाळा, वीजबिल वसूली, ओबीसी आरक्षण, मंत्र्यांचे घोटाळे यासह विविध मुद्यांवर आवाज उठवणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. एकूणच पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला धारेवर धारण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.