अहमदनगर : प्रतिनिधी
सोमवारी झालेल्या मतदानानंतर राज्यातील बहुतांश नगरपंचायत निवडणुकांचे निकाल स्पष्ट होत आहेत. आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत-जामखेडमधील कर्जत नगरपंचायतीमध्ये भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांना जबरदस्त धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती वर्चस्व मिळवले आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचा दारुण पराभव करत १७ पैकी १२ जागा जिंकल्या आहेत.
आज सकाळी कर्जत नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी १२ जागा जिंकल्या. तर राम शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपने केवळ दोनच जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायतीवर भाजपाची एकहाती सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र राम शिंदे यांच्या या विश्वासाला रोहित पवार यांनी कात्रजचा घाट दाखवत कर्जत नगरपंचायतीवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
दरम्यान, राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवत दबाव, दडपशाही, पैशाचा उदमात आणि सत्तेची मस्ती यापूर्वी कर्जतकरांनी पाहिली नव्हती, अशी टीका केली आहे. राज्यात बहुतांश नगरपंचायतीवर भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वासही राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.