
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेतील अनिल परब आणि रामदास कदम हे दोन नेते गेल्या अनेक दिवसांपासून आमनेसामने उभे ठाकले आहेत. अशातच आज पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली. कोण शिवसेनेशी एकनिष्ठ आहे आणि कोण गद्दारी करत आहे, हे पक्ष प्रमुखांनी जाणून घ्यावे, असे आवाहनच त्यांनी आज केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मुलाला व त्यांच्या समर्थकांचा सातत्याने छळ होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीची मदत घेतली जात असल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला. शिवसेना सोडण्याच्या प्रश्नावर रामदास कदम म्हणाले, मी अजून निर्णय घेतलेला नाही. मी आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेईन आणि मग निर्णय घेईन.
पुढे काय करणार असे विचारले असता रामदास कदम म्हणाले की, पुढे काय करायचे ते आम्ही ठरवू. अन्याय सहन करण्याची मर्यादा असते. नगरपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मी निर्णय घेईन. पण उद्धवसाहेबांना हात जोडून विनंती आहे की, पक्षात जे काही चालले आहे त्यावर तुम्ही लक्ष द्या.
मागील काही दिवसांपासून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यात वाद सुरू आहेत. रामदास कदम यांनीच भाजप नेत्यांकरवी अनिल परब यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार केल्याचीही चर्चा आहे. अशातच आज रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर तोफ डागली आहे. मला आणि माझ्या मुलाला सातत्याने डावलण्यासाठी अनिल परब करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.