मुंबई : प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने पुढील पाच-सहा दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार राज्यात पुढील पाच ते सहा दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. काल कोकणासह, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागात मोठा पाऊस झाला. त्यानंतर आता पुढील पाच-सहा दिवस आणखी जोरदार पाऊस होण्याची चिन्हे आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये रौद्र रुप धारण करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्याच्या प्रदेशात हा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती ३-४ दिवस कायम राहण्याची शक्यता असून गुजरात आणि त्याच्या जवळपासच्या प्रदेशात वादळसदृश्य स्थिती राहील. तर २३ जुलैपर्यंत उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र कायम राहू शकते.
भारतीय हवामान विभागाकडून १९ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
२०, २१ आणि २२ जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पाऊस दमदार हजेरी लाऊ शकतो. बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा,यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.