रायगड : प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई आणि पुण्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबई आणि पुण्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पाठोपाठ आता रायगड जिल्ह्यातील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यामुळे जिल्ह्यातील शाळांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामधे पहिली ते नववीसह अकरावीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर ऑनलाईन शिक्षणासाठी मुभा देण्यात आली आहे. जिल्हातील महाड तालुक्यात असणाऱ्या विन्हेरे हायस्कुलमधे १५ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
सर्व शाळांमधील पहिली ते नववी तसेच अकरावीचे वर्ग ३१ जानेवारी पर्यंत बंद राहतील. मात्र 10 वी आणि 12 वीचे वर्ग बोर्डाची परीक्षा असल्याने यातून वगळण्यात आले आहेत. यात १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना कोरोना नियमांचे पालन करावं लागणार आहे. जिल्ह्यात अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ८९० इतकी झाली आहे.