मुंबई : प्रतिनिधी
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांनी शिवसेनेचे आमदार तथा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुकी व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
विधीमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन आज सुरू झाले. या अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच भाजप आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. आज राष्ट्रवादीचे नेते तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत ओबीसी आरक्षणाबाबत ठराव मांडला. त्यावेळी भाजप आमदारांनी प्रचंड गोंधळ घालत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी संपूर्ण वस्तुस्थितीची माहिती घेत चर्चा केली. सभागृहातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. त्यानुसार भाजपचे आमदार पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशीष शेलार, अभिमन्यु पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावळ, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.