पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
९ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या धाडीत लांडगे यांच्यासह पाचजणांना अटक केली आहे. स्थायी समितीच्या बैठकीनंतर अध्यक्षावरच झालेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पुणे लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन लांडगे यांच्यासह पाचजणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. निविदा मंजुरीनंतर कामाचे आदेश काढण्याकरिता ही लाच घेण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.
आज महापालिकेत सर्व साधारण सभा सुरू असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली होती. स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयीन प्रमुखासह अन्य कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
दरम्यान, या कारवाईमुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आता गोत्यात आला आहे. अवघ्या काही महिन्यांवर निवडणुका येवून ठेपलेल्या असताना विरोधकांसाठी ही आयती संधी चालून आली आहे.