
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब मारहाण प्रकरणात अडकलेले भाजप नेते आमदार नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात शरण आले आहेत. यावेळी नितेश राणे यांच्याकडून नियमित जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नितेश राणे यांचा जामीन अर्ज काल (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने त्यांना १० दिवसांच्या आतमध्ये जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे आदेश दिले होते. जिल्हा न्यायालयात शरण आल्यानंतर जामीनासाठी नियमित अर्ज करता येईल, असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानंतर आज दुपारी नितेश राणे त्यांच्या वकिलांसह जिल्हा न्यायालयात हजर राहिले होते.
नितेश राणे यांनी न्यायालयामध्ये नियमित जामीनासाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली आहे. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणावर सोमवारी सुनावणी ठेवली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आम्ही माध्यमांशी या प्रकरणावर भाष्य करु शकत नाहीत, असे नितेश राणे यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले आहे. सोमवारी सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून काय निर्णय देण्यात येईल. हे पाहूनच याप्रकरणी प्रतिक्रिया दिली जाईल असे वकिलांनी सांगितले.