आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मनोरंजनमहानगरेमहाराष्ट्रमुंबई

Breaking News : नवीन वर्षाचं स्वागत करताय..? जरा थांबा; राज्य शासनाने जाहीर केलीय ‘ही’ नियमावली

मनोरंजन
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

२०२१ या वर्षाची अखेर आणि नवीन वर्षाच्या स्वागतावर राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. ओमीक्रॉन विषाणूचा धोका वाढल्यामुळे ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने करण्याबाबत गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  

मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच ओमीक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. ओमीक्रॉन विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातच आता या वर्षाचा शेवट होवून नवीन वर्ष सुरू होत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

अशी असेल नियमावली..!

कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी व दि. १ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे.  राज्यात २५ डिसेंबर पासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात यावे.

३१ डिसेंबर, २०२१ व नूतन वर्ष, २०२२ चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५०% पर्यंत आणि खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५% च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतर राखले जाईल, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.  कार्यक्रमाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, असेही गृह विभागाने कळवले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. तसेच ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही गृहविभागाने दिल्या आहेत.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी इत्यादी ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करु नये. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us