नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकीकडे यूपीएकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचे संकेत मिळत आहेत. अशातच शरद पवार यांनी कॉँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली आहे. या भेटीवेळी शरद पवार यांच्यासोबत कॉँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि खासदार संजय राऊत हेही उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत काय चर्चा झाली याबद्दल माहिती मिळाली नसली तरी ही भेट झाल्याच्या वृत्ताला दस्तुरखुद्द संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांनी देशातील भाजप विरोधातील पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यानच्या काळात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रथमच शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आज शरद पवार यांच्यासोबत कॉँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित होते. या भेटी नेमकी काय चर्चा झाली याबद्दल माहिती पुढे आलेली नाही. परंतु कालच यूपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाला सोनिया गांधी यांनी अनुमोदन दिल्याची माहिती समोर आली होती. अशातच शरद पवार यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.