जेजूरी : प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. कोरोना प्रसाराचा वेग लक्षात घेता आता जेजूरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठीही काही नियम पाळावे लागणार आहेत. जेजूरीच्या मंदिरात दोन लस घेतलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांनी ही माहिती दिली.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजूरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जेजूरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठीही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मंदिरात येणाऱ्या भाविकांनी दोन लस घेतल्या असतील तरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच लसीकरण प्रमाणपत्र तपासले जाणार आहे. तसेच मास्कशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे पंकज निकुडे यांनी सांगितले. सुरक्षितता महत्वाची असल्यामुळे भाविकांनी नव्या नियमांचे पालन करून मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.