
मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भावास काँग्रेसला जबाबदार धरले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप विरोधात ‘ माफी मागा’ आंदोलन करणारं असल्याची माहिती दिली.
संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल आणि आज भाषण झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मोदी जर भाजपचे प्रचारक म्हणून वागत असतील तर त्यांनी त्या पदाची गरिमा घालवली आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी. त्यासाठी उद्या आम्ही भाजपच्या कार्यालयासमोर माफी मागा असे फलक घेऊन उभे राहणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.
राज्यातील जनतेने भाजपला सत्तेपासून दूर केले. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या भाजप नेत्यांना तेव्हापासून द्वेषाची कावीळ निर्माण झाली. महाराष्ट्राबद्दल राज्यातील भाजप नेत्यांना थोडीफार आस्था असेल तर त्यांनी मोदींच्या वक्तव्याचा निषेध करावा. नाहीतर महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपची ‘महाराष्ट्र द्रोही’ अशी नोंद होईल असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.