इंदापूर : प्रतिनिधी
नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी येणाऱ्या मृतदेहांचे अवशेष चक्क उकिरड्यावर टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील हे अवशेष डुक्कर आणि कुत्रे आदी प्राणी खात असल्याचेही आढळले आहे.
इंदापूर तालुक्यातून पुणे-सोलापूर महामार्ग गेला आहे. त्यामुळे या भागात सातत्याने अपघात होत असतात. आपघातातील मृत व्यक्तींचे इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले जाते. तालुक्यात हे एकमेव ठिकाण असल्यामुळे सातत्याने इथे शवविच्छेदनासाठी मृतदेह येत असतात. मात्र मृत्यूनंतरही मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे.
मृत व्यक्तींच्या शरीराच्या अवशेषांची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता ते प्लॅस्टिक बरणीसह शवविच्छेदन गृहाशेजारीच अर्धवट जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. हे अवशेष पूर्णपणे जळाले नसल्यामुळे सध्या डुक्कर, भटकी कुत्री या अवशेषांना खाताना दिसत आहेत. आज इंदापूर तालुक्यातील अगोती येथील जनार्धन सिताराम गोळे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर त्यांचे नातेवाईक गणेश पवार यांना शवविच्छेदन गृहाशेजारी मृत व्यक्तींचे अवशेष आढळले.
दरम्यान, याबाबत इंदापूर उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुहास शेळके यांना विचारणा केली असता सदरील प्रकार घडला असल्याची कबुली त्यांनी दिली. संबंधित अवशेषांची विल्हेवाट अशा पद्धतीने लावण्याचे आपण कोणतेही आदेश दिले नसल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. याबाबत आता वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.