पुणे : प्रतिनिधी
आरोग्य विभाग पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलीसांनी एका पोल्ट्री व्यावसायिकाला अटक केली आहे. अतुल प्रभाकर राख ( वय ३२ वर्षे, रा. बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
जीवन सानप हा या प्रकरणात एजंटचे काम करत होता. त्याच्या दोन भावांना अटक केली असून तो फरार आहे. त्यांनतर गुरुवारी पोल्ट्री व्यावसायिक अतुल राखला अटक केली आहे. जीवनचा तो मेहुणा आहे. तो परीक्षेतील उमेदवारांना पैसे गोळा करून जीवनकडे देत होता.
पोलीसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून मोबाईल जप्त केला आहे. त्याच्या मदतीने जीवनचा शोध पोलीस घेणार आहेत.आरोग्य विभाग भरतीचा पेपर सेट केल्याप्रकरणी आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना अटक केली होती. त्यांच्यावर पेपर फोडल्याचा पोलीसांना संशय आहे.
आतापर्यंत या प्रकरणात १२ पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी अटक केले आहे. आणखी काही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.