मुंबई : प्रतिनिधी
आवाजी पद्धतीने मतदान घेवून विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामूळे त्यांच्या विरोधात न जाता निवडणूक रद्द करण्याचा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष वेळोवेळी पहायला मिळाला आहे. राज्यपालांकडून वेळोवेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली गेली आहे. त्यातच मागील अधिवेशनात राज्य सरकारने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतर हा वाद आणखीच वाढल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड या अधिवेशनात आवाजी मतदान पद्धतीने घेतली जाणार होती. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेवून निवडणूक घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी निवडणूक पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. अशा पद्धतीने विधानसभा अध्यक्षांची निवड करता येणार नसल्याचे राज्यपालांनी कळवले आहे.
राज्यपालांच्या आक्षेपानंतरही ही निवड करायचीच असा चंग कॉंग्रेसने बांधला होता. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर राज्यपालांच्या विरोधात न जाण्याची भूमिका घेण्यात आली. त्यामुळे सध्यातरी विधानसभा अध्यक्षांची निवड रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
L