नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी निलंबित असलेले भाजपच्या १२ विधानसभा सदस्यांचे निलंबन मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. विधानसभेच्या सभापतींनी निलंबित केल्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने भाजप आमदारांना जोरदार झटका देत निलंबन मागे घेण्यास नकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान विधानसभेच्या ठरावाला स्थगिती देता येणार नाही. निलंबित करण्यात आलेल्या आमदारांनी विधानसभेच्या सभापतींकडे निलंबन मागे घेण्याची विनंती करावी, अशी सूचना देत सर्वोच्च न्यायालयाने निलंबन मागे घेण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात निलंबित १२ आमदारांना सहभागी होता येणार नाही. एक वर्षासाठी भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.
पावसाळी अधिवेशनात काय झाले होते ?
पावसाळी अधिवेशना दरम्यान तालिका अध्यक्ष भास्कर जाधव सभागृहात बोलत असताना भाजपाच्या आमदारांनी गोंधळ घातला. तालिका अध्यक्षासमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासमोरील माईक ओढण्याचा प्रयत्न केला. या गोंधळानंतर काही काळासाठी सभागृह स्थगित केल्यानंतर भाजप आमदारांनी सभापतींच्या दालनात जाऊन भास्कर जाधव यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या घटनेमुळे भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
कोण आहेत भाजपचे निलंबित आमदार..?
- गिरीश महाजन – जामनेर जि. जळगाव
- आशिष शेलार – वांद्रे पश्चिम,मुंबई
- संजय कुटे – जळगाव जामोद,जि. बुलढाणा
- राम सातपुते – माळशिरस,जि.सोलापूर
- अतुल भातखळकर – कांदिवली पूर्व,मुंबई
- हरीश पिंगळे – मूर्तिजापुर,जि.अकोला
- कुमार जयस्वाल – शिंदखेडा जि.बुलढाणा
- योगेश सागर – चारकोप ,मुंबई
- किर्तिकुमार भांगडिया – चिमूर जि. चंद्रपूर
- नारायण कुचे – बदनापूर जि. जालना
- पराग आळवणी – विलेपार्ले, मुंबई
- अभिमन्यू पवार – औसा जि. लातूर