
पुणे : प्रतिनिधी
येत्या १ फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मागील आठवड्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आठवडाभरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येनुसार शाळा आणि महाविद्यालयांबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले होते त्यानंतर आज एक फेब्रुवारीपासून शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
१५-१८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरणाची सोय शाळेतच करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पहिली ते आठवीपर्यंत केवळ चार तासाचा वर्ग भरवले जाणार असून नववीपासून पुढील वर्गाचे वर्ग पूर्णवेळ भरवणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही हा निर्णय पालकांचा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.