सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला. हा पराभव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्याच नेत्यांमुळे झाला, असा आरोप करत शशिकांत शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा कार्यालयावर दगडफेक करत आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, या प्रकारानंतर शशिकांत शिंदे यांच्या वतीनं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच कार्यकर्त्यांच्या या कृतीबद्दल शिंदे यांनी माफीसुद्धा मागितली आहे.
‘मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभं केलं, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका. ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो. पवारसाहेब, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो. भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे सर्वांना माहिती आहे. फक्त माझी एकच भूमिका असेल कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये.’ असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे व अपक्ष ज्ञानदेव रांजणे एकमेकांसमोर उभे होते.रांजणे हे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या निवडणुकीत सहकार पॅनलमधील काही नेत्यांनी शशिकांत शिंदे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला आहे.
या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेना विजयी करा, असा निरोप पक्ष अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी जिल्ह्यातील श्रेष्ठींना पाठविला होता. पण पक्षश्रेष्ठींचा मान न ठेवता काही नेत्यांनी अपक्ष उमेदवाराला ताकद देत शिंदेंना पडण्याचं काम केलं आहे, असा आरोप समर्थकांकडून करण्यात येत आहे.
शिंदे यांच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक केली. दगडफेकीनंतर कार्यकर्त्यांनी शशिंकांत शिंदे यांच्या नावाची घोषणाबाजीसुद्धा केली. शशिकांत शिंदे हे शरद पवार आणि अजित पवार यांचे ही निकटवर्तीय समजले जातात. मात्र आजच्या दगडफेकीचे पडसाद नक्की काय उमटतील आणि पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.