
पिंपरी : प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे आज पिंपरी-चिंचवडमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
गजानन बाबर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना पिंपरी-चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यांच्या पश्चात पत्नी राजश्री बाबर आणि २ मुले असा परिवार आहे.
मूळच्या सातारा जिल्ह्यातील असलेल्या गजानन बाबर यांनी वाई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विविध संघटनांमध्ये असलेल्या दबदब्यामुळे त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तीनवेळा नगरसेवक म्हणून काम केले. तर हवेली मतदारसंघातून दोनवेळा आमदारही झाले.
२००९ साली मावळमधून ते लोकसभेवर निवडून गेले. २०१४ मध्ये मात्र त्यांची उमेदवारी रद्द करुन श्रीरंग बारणे यांना संधी दिली. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.