सांगली : प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावात वाढ होत असल्याने लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यानुसार रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळणार आहे. दरम्यान, निर्बंध शिथिल करण्याबाबत आज संध्याकाळी अध्यादेश निघणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देणार असल्याचे तसेच राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत संकेत दिले होते. आज सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त भागांच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी असेल त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे. जिथे रुग्ण संख्या आटोक्यात नाही, तिथे निर्बंध कायम राहणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. नागरिकांच्या आरोग्याची आपल्याला चिंता असून निर्बंध शिथिल झाले तरी नियम पाळणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना आटोक्यात येत असताना राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करून जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता नियमांचे पालन करून पुन्हा कोरोना वाढणार नाही याची खबरदारी नांगरिकांसह व्यापारी वर्गालाही घ्यावी लागणार आहे.