सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच नितेश राणे यांना अटक करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी न्यायालयाबाहेर त्यांची गाडी अडवली. परंतु नितेश राणे आणि पोलिसांत बाचाबाची झाली. त्यानंतर ते पुन्हा न्यायालयात गेले.
सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर काल (सोमवारी) सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. आज त्यांच्या जामीन अर्जावर अंतिम निकाल राखीव ठेवण्यात आला होता.
न्यायालयाने अंतिम निकाल देत नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे नितेश राणे यांना अटक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे न्यायालयातून बाहेर जात होते. न्यायालयातून बाहेर जात असताना पोलिसांनी राणे यांची गाडी अडवली.
कोणत्या अधिकाराखाली आम्हाला अडवले आहे, उत्तर द्या असे विचारत नितेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी मोठ्या संख्येने राणे यांचे कार्यकर्ते उपस्थित असल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर राणे बंधू त्यांच्या वकिलांसोबत पुन्हा न्यायालयात जाऊन वकिलांसोबत चर्चा केली.