
पुणे : प्रतिनिधी
राज्यातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासा देणारी बाब असली तरी दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या व्हेरीएन्टमुळे पुन्हा कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दक्षता घेणे आवश्यक असून गरज पडल्यास काही बाबीत राज्यात निर्बंध लागू करावे लागतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
आज पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरीएन्टमुळे चिंता वाढल्याचे सांगितले. सद्यस्थितीत रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळेच पुणे शहर आणि पिंपरी-चिंडवडमधील जंम्बो कोविड रूग्णालय सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साधारण परिस्थिती पाहून ३१ डिसेंबर रोजी या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसंदर्भात केंद्र सरकारकडून दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. मात्र देशांतर्गत विमान वाहतुकीसंदर्भात काही नियम शिथिल करण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली. काही देशांमध्ये नव्या व्हायरसचा फैलाव वाढत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. याबाबत तज्ञांनी वेगवेगळी मते व्यक्त केलेली आहेत. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. परिस्थितीनुसार काही निर्णय घेतानाच गरज पडल्यास राज्यात काही निर्बंध लागू करावे लागतील, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.