पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन लसी घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. तसेच कोरोनाचे संकट अद्याप टळले नसून प्रत्येकानेच काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर पुढील तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. याबद्दल डॉ. कोल्हे यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी मतदारसंघातील पूर्वनियोजित सर्व दौरे आणि कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरु केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा, सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करुन घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करावे असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.