पुणे : प्रतिनिधी
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर असताना मोठा राडा झाला आहे. आज सकाळीच किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर १०० कोटी रुपयांचा कोरोना सेंटर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर पुणे दौऱ्यावर असताना शिवसैनिकांकडून मारहाण झाली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट शेअर करत शिवसैनिकांनी मारहाण केली असल्याचे सांगितले आहे.
किरीट सोमय्या आज पुण्यामध्ये जम्बो कोविड सेंटर भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी आले होते. यासाठी किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. त्याअगोदर महानगरपालिकेतून शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे निघालेल्या किरीट सोमय्या यांची गाडी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी अडवली. त्यानंतर प्रचंड गदारोळ उडाला.
किरीट सोमय्या महापालिकेत असतानाच शिवसैनिक आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे निघाले असता महापालिकेच्या प्रवेशद्वारा वरच्या पायऱ्यांवर शिवसैनिकांनी त्यांना घेरले. सोमय्या यांना सुरक्षारक्षकांनी बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठी झटापटी झाली. यामध्ये किरीट सोमय्या पायऱ्यावरून खाली आपटले. यानंतर किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांकडून मारहाण झाली असल्याचे ट्विट केले आहे.