पुणे : प्रतिनिधी
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना काल पुण्यात झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह इतर सात कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय मोरे व इतर शिवसेनेचे कार्यकर्ते किरीट सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला होता.
जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहारप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या काल पुणे महानगरपालिकेत आले होते. संजय मोरे आणि शिवसेनेचे इतर कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी तेथे पोहोचले होते. निवेदन न स्वीकारल्यामुळे किरीट सोमय्या यांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. किरीट सोमय्या महानगरपालिकेच्या बाहेर पडत असताना पायऱ्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. यामध्ये किरीट सोमय्या पायर्यांवरून कोसळले होते.
किरीट सोमय्या यांना संचेती उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी आठ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर भा. दं. वि. कलम ३७(१), १३५, १४३, १४७, १४९, ३२३, ३३६, ३४१, ३३७,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.