कात्रज : प्रतिनिधी
पुणे शहरातील कात्रज चौकामध्ये ‘कात्रजचा खून झाला’ या आशयाचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरची शहरभर चर्चा चालू होती. त्यामुळे या बॅनर लावणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत तुकाराम लोणकर ( वय ५२ रा. शिंगवा सोसायटी , कोंढवा खुर्द) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, अज्ञात व्यक्तीने महापालिकेची परवानगी न घेता सोमवारी (ता.२७) रात्रीच्या सुमारास कात्रज चौकामध्ये ‘कात्रजचा खून झाला’ असा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरने संपूर्ण शहरात खळबळ उडवली होती. त्यामुळे महापालिकेचे निरीक्षक हनुमंत लोणकर यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॅनर लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीने महानगरपालिकेची परवानगी न घेता विनापरवाना बॅनर लावून विद्रूपन केले आहे. त्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियमन १९९५ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.