Site icon Aapli Baramati News

Breaking News : एसटी कर्मचाऱ्यांना आजचा शेवटचा अल्टिमेटम; उद्यापासून निलंबनाची कारवाई होणार

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतरही संप चालूच आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आजचा शेवटचा दिवस देण्यात आला आहे. जर कर्मचारी आजपासून कामावर हजर राहिले नाही; तर त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राज्य सरकारने त्यांच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या आहेत.त्यानंतर कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र बहुतांश कर्मचारी  विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे राज्यातील संपूर्ण बससेवा विस्कळीत झाली आहे. शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना प्रवास करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. 

मंडळाने कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी  शेवटची संधी दिली आहे. आज कामावर हजर न राहिल्यास उद्यापासून बडतर्फ आणि निलंबनासारख्या कारवायांना कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कारवाई होण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य चाचण्या करून घेण्याचे आदेश महामंडळाला दिले आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version