मुंबई : प्रतिनिधी
पालक आणि विद्यार्थ्यांमधील दहावीच्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) आणि बारावीच्या उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) परीक्षेबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. या दोन्ही परीक्षा नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार आहेत. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून, तर बारावीची ४ मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
वर्षा गायकवाड यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियमित मूल्यमापन पद्धतीनेच होणार आहेत. दहावीच्या परीक्षा १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत पार पडतील. तसेच बारावीच्या परीक्षा ४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान होणार आहेत. या दोन्ही परीक्षा कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून पार पडणार आहेत.
बारावीचा निकाल जूनच्या २०२२ दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि दहावीचा निकाल जुलै २०२२ दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच वर्षा गायकवाड यांनी परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. त्यासाठी राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यांच्या सूचनांचा या सर्व प्रक्रियेत समावेश केला आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित व पोषक वातावरण निर्माण व्हावे या अनुषंगाने परीक्षा वेळापत्रक आणि पद्धतीबद्दलही त्यांच्याशी चर्चा केली असल्याचे वर्षा गायकवाड यांनी नमूद केले.